Friday, July 8, 2022

 कमलासन (कमल हासन )ह्याचा विक्रम श्रीधर तिळवे नाईक 

भारतीय परंपरेत कमळ हे कुंडलिनीचं व सृजनशीलतेचं प्रतीक मानलं जातं आणि जणू नाव सार्थ करण्यासाठी कमलासन (कमळाचे आसन )  सृजनशीलतेचे नवे नवे आयाम दाखवत असतो तो मूळचा लेखक हे आता सांगितले तर अनेकांचा विश्वास बसणार नाही साहजिकच लेखक दिग्दर्शक म्हणूनच त्याला करिअर करायचे होते 

के बालचंदर ह्यांच्याकडे आलेल्या एकाच बाईकवरून फिरणाऱ्या दोन तरुणांना गुरु म्हणून त्यांनी पूर्ण वेगळे कानमंत्र दिले त्यातील एकाला सांगितली मेथड ऍक्टिंग तर दुसऱ्याला स्टाइलाईझ्ड पहिला कमलासन झाला दुसरा रजनीकांत १९७० साली मानवन मध्ये के बालचंदर ह्यांनीच त्याला लॉन्च केले दोघेही आपल्या गुरूशी इतके एकनिष्ठ कि गुरूच्या काही कार्यक्रमात एक डाव्या बाजूला तर दुसरा उजव्या बाजूला बसायचे. 

स्टॅनिस्लॅव्हस्कीची भारतीय चित्रपटातील परंपरा गजानन जहागीरदार (एफटीआयचे पहिले संचालक तेच होते )ह्यांनी सुरु केली आणि अशोक कुमारने ती स्वीकारून पुढे डेव्हलप करून सादर करायला सुरवात केली पुढे दिलीपकुमारने ती प्रस्थापित केली ह्या स्कूलमधील सर्वश्रेष्ठ अभिनेता कमलासन होय माझा स्वतःचा तो सर्वात लाडका अभिनेता आहे 

माझ्यादृष्टीने नम्बर एक कमलासन त्याच्याखालोखाल नासिरुद्दीन शहा ! सदमातला पॅशनेट प्रेमी ,पुष्पकमधला कॉमिक ,नायकन मधला दादा ,अप्पू राजातला बुटका , विक्रममधला ऍक्शन हिरो ,चाची ४२० मधली चाची, ,दशावथारमातले दहा रोल (शिवाजी गणेशनने एकाच फिल्म्समध्ये बहू (दहा) रोल्सची परंपरा सुरु केली होती मग दिलीपकुमार संजीवकुमार गोविंदा ) हे राममधला साकेथ राम आणि अनेक नृत्यप्रधानमधला नर्तक ! कमर्शियल आणि क्लासिकल दोनी शैलीत निपुण कमलासनच ! नासिरुद्दिनचे नृत्य व गाण्यातले लिपसिंकिंग म्हणजे बोंबच आहे . तो ह्या दोन गोष्टीत कमालासनपेक्षा कमी पडतो 

जो मुलगा वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रपती नॅशनल अवॉर्ड मिळवतो तो पुढे काय करणार ते स्पष्टच होते मला स्वतःला अष्टपैलू लोकांच्याविषयी नेहमीच आदर वाटत आलाय फिल्म इंडस्ट्रीत व्ही शांताराम , गुरुदत्त , किशोरकुमार , कमलासन व धनुष अशी एक अष्टपैलूंची परंपराच आहे त्यांच्यातही कमलासन हा कदाचित सर्वश्रेष्ठ असावा कारण इतरांच्यापेक्षा मेकप हा त्याच्याकडे एक एक्स्ट्रा असेट आहे किशोरकुमार नृत्यात उरलेल्या चौघांच्या तुलनेत काहीच नाही पण गायक म्हणून अव्वल ! गुरुदत्त हा स्वतः कोरिओग्राफरही पण त्याने आपल्या नृत्यकौशल्याला फारसा वावच दिला नाही दिग्दर्शक म्हणून ह्या चौघांच्यात तो व व्ही शांताराम अव्वल ! कमलासन अभिनयात ह्या सगळ्यांचा बाप ! ज्याला कम्प्लिट ऍक्टर म्हणावा असा एकमेवाद्वितीय ! 

साहजिकच १९८० पासून मी त्याचा शक्यतो एकही चित्रपट चुकवत नाही कोल्हापूरात सर्वच त्याचे सर्वच चित्रपट रिलीज होत नसत म्हणून मी केवळ त्याच्यासाठी बेळगाव वारी करायचो पुढे एक दुजे के लिये (हा मी २५ वेळा बघितला होता )रिलीज झाल्यावर कोल्हापुरातही त्याच्या अनेक फिल्म्स रिलीज व्हायला लागल्या त्याने कोल्हापुरात नृत्यशिक्षण घेतल्याने त्याच्याविषयी त्या वयात एक वेगळे आकर्षण होते 

अश्या ह्या कलावंताला पुढे अभिनयाच्या आर्टिफिशियल विविधतेचे जेव्हा व्यसन लागले तेव्हा आमच्या दृष्टीने तो एक त्रासदायक प्रकार झाला कथा पटकथा फाफललेली व फक्त अभिनय हे समीकरण फारसे भुरळ घालत नाही 

परिणामी ओव्हरबजेट गेलेल्या फिल्म्स आणि झालेली कर्जे ह्याने कमलासन घायाळ झाला आणि त्याच्या राजकमलचा एक तरी प्रोजेक्ट सुपरहिट व्हावा म्हणून त्याचे चाहते पाण्यात देव घालून बसले ह्याच काळात गौतमीबरोबरचा ब्रेकप , सिम्रनबरोबर अफेयरच्या अफवा , सारिकाबरोबरचा घटस्फोट , अक्षराचा बौद्ध धर्म स्वीकार , कधी न्हवे ते सामाजिक रेट्यामुळे आपण ब्राम्हण आहोत अशी त्याने दिलेली कबुली , द्रविड आयडेंटिटीचा वापर करावयास त्याने दिलेला नकार आणि सेक्युलॅरिझमचे त्याने केलेले कट्टर समर्थन ह्यामुळे तो अधिकच आतबट्ट्यात गेला 

पण २०२१ पासून माहोल बदलत चाललाय आणि त्यांच्याविषयीचा कडवटपणा कमी होत चाललाय साउथचे अनेक चित्रपट नॉर्थवाल्यांनी स्वीकारल्याने दक्षिण उत्तर वाद फिल्मच्या पातळीवर मवाळ झाला आणि कमलासन अगदीच काही चुकीचं बोलत नाही असं सर्वांना वाटायला लागलं साहजिकच लोकेश कनगराज (हिंदीत कनकराज ) जेव्हा विक्रम हा विक्रमचा दुसरा भाग (सिक्वेल म्हणता येईल का ? मला शंका आहे )घेऊन आला तेव्हा वातावरण बरंच निवळलं होतं आणि फिल्मने ह्यावर्षी तमिळमध्ये सर्वाधिक गल्ला गोळा करण्याचा विक्रम केला 

लोकेशने कमलची  अभिनयातील आर्टिफिशियल विविधतेची भूक नैसर्गिक करून एकीकडे विविधता दिली पण ही विविधता व्यक्तिरेखेवर मात करणार नाही ह्याची काळजी घेतली कमलासनच्या चित्रपटात अनेकदा फक्त तोच दिसायचा इथे मात्र विजय सेथुपती व फाहद फासील ह्यांना परफेक्ट वाव दिला परिणामी कथा वधारली अलीकडे लेखक असल्याने कमलासन नको ती घुसखोरी करायचा लोकेशने त्याला लिखाणापासून दूर ठेवून कमर्शियल प्लॉटचं कमलासन अलीकडं जे भजं करायचा ते त्याला करू दिलं नाही परिणामी एक परफेक्ट कमर्शियल फिल्म दिली जिने ५०० करोडला टच केलं आहे 

मला स्वतःला सर्वाधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे कि कमलासनवर असलेलं सर्व कर्ज आता फिटेल त्याच्यासारख्या कलावंतांवर ही वेळ यायलाच नको होती पण आली साऊथच्या सर्वच कलावंतांनी त्याला सहकार्य दिलं अन्यथा मास्टरमध्ये केलेल्या व्हिलनला बॉडी लँग्वेजच्या दृष्टीने पुन्हा रिपीट करण्यात विजय सेथुपतीला काय इंटरेस्ट असणार ? आणि सूर्या चक्क कॅमिओ व्हिलन ! पण कमलासन बरोबर काम करण्याची संधी व त्यांची कर्जापासून मुक्तता व्हावी म्हणून असलेली कळकळ  ह्यांनी हे सहकार्य निर्माण केलं 

कमलासनचे राजकीय विचार मला अनेकदा पटले नाहीत पण कलावंताचे राजकीय विचार व त्याची कला ह्या दोन गोष्टी आपण वेगळ्या केल्या पाहिजेत असं मी मानतो सामाजिक बाबतीत तो समाज मागे न्हेत नाही ना एव्हढं मात्र मी अवश्य पाहतो कमलासन कायमच सामाजिक पातळीवर पुढारलेला होता व आताही आहे त्यामुळे तो हिट होणं गरजेचं होतं तो झाला ह्याबद्दल त्याचे व लोकेशचे मनापासून आभार ! विजय सेथुपतीने आता व्हिलनची काम करणं थांबवावं जेवढे व्हिलन त्याने केले ते खूप झाले आम्ही आता काही वेगळं पहायला उत्सुक आहोत जे फक्त तोच देऊ शकतो . 


श्रीधर तिळवे नाईक 







No comments:

Post a Comment