Tuesday, August 20, 2019

खय्यामना आमच्या पिढीने ऐकले ते कभी कभी त्रिशूल पासून ते एव्हढे क्लासी संगीतकार आहेत ह्याची आम्हाला कल्पनाच न्हवती त्यांचं तोंडात बसलेलं पहिलं गाणं गापूची गापूची गम गम हे त्रिशूल मधलं लहानपणासाठी असली गाणी परफेक्ट !  पुढे संगीताची अधिक अक्कल आली आणि डान्ससाठी सोकावलेलं माझं शरीर डान्सिकल गाण्याव्यतिरिक्त मेलडीही ऐकायला लागले पुढे लक्ष्यात आले कि खय्यामसाहेबांची क्लासिकल इमेज इतकी त्यांच्या फॅन्सनी मोठी केलीये कि गापूची व तेरे चेहरेसे व मौसम मौसम लव्हली मौसम(थोडीसी बेवफाई ) सारखी गाणी चक्क कानाआड केली जातायत

लता मंगेशकरांनी त्यांचे सर्वात बेस्ट गाणे म्हणून रझिया सुलतान मधले ए दिले नादान निवडले तेव्हा थोडा धक्का बसला होता पण नंतर कळले कि बाई अधूनमधून घोषणा करत असतात मात्र हे एक अफलातून गाणे होते एव्हढे निश्चित

बाजार आणि उमराव जान कळस होते एका अर्थाने आमच्या पिढीने त्यांचा बेस्ट फॉर्म बघितला

त्याआधीची त्यांची "हे कली कली के लंबपर " " बहारो मेरा जीवनभी संवारो "  " श्यामे गमकी कसम "  "तू ही सागर तूही किनारा( हे सुलक्षणा पंडितने पंडितने गायलेले गाणे तिला फिल्मफेयर देऊन गेले होते )" ही माधुर्याने भरलेली गाणी कानांना खिळवून ठेवणारी होती

गीतांच्या बोलाबाबत ते गीतात काव्य असण्याबद्दल सजग होते आणि त्यामुळेच बावरी चा अपवाद वगळता आनंद बक्षीच्या वाट्याला ते फारसे गेले नाहीत गुणवत्तेचा आग्रह हा तुम्ही जर यशस्वीही झालात तर ऐकून घेतला जातो जसा कि तो नौशादबाबत ऐकून घेतला गेला खय्यामच्या नशिबाने ह्याबाबत १९८५ नंतर पुन्हा पलटी मारायला सुरवात केली आणि एकापाठोपाठ एक फिल्म्स फ्लॉप व्हायला लागल्या हिट है तो फिट है ह्या चालीने चालणाऱ्या बॉलिवूडमध्ये हे परवडणारे न्हवते त्यातच नंतर बप्पी लाहिरीच्या हिम्मतवालाने संगीताचा बाज पूर्णच बदलला आम्ही लोक आता तरुण झालो होतो आणि आम्हाला फक्त नाचायचं होतं ऐकायचं न्हवतंच बाप्पीची गाणी नाचायला लय भारी असल्याने आम्ही ता थय्या ता थय्या करत बसलो आम्ही खय्याम फेकूनच दिला खरंतर आणि त्यातच त्यांच्या फिल्म्स वाईट होत्या आता संगीतासाठी फिल्म्स बघण्याचा जमाना संपला होता कारण कॅसेट्स आल्या होत्या खय्यामसाठी वाईट फिल्मा बघण्यापेक्षा त्यांचं संगीत कॅसेटवर ऐकणे आमच्या फाटक्या खिशाला परवडेबल होतं नदीम श्रवणमुळे मेलडी परत आली तरी ही मेलडी अभिजात न्हवती तिच्यात एक कामचलाऊपणा होता खय्याम अभिजात होते त्यामुळे फिट्ट होईनात बरं १९८७ नंतरची गाणी आधीच्या दर्जाला मॅच होणारी न्हवती शिवाय नदीम श्रवण संगीतात एक तरी गाणे डान्ससाठी बनवायचे म्हणजे साजण मध्ये देखा हैं पहली बार साजणकी आँखोंमे प्यार हे डान्सिकल होतेच खय्याम असे गाणे देऊ शकत नाहीत अशी त्यांची व इतरांची पण समजूत होती वास्तविक ते डान्सिकल गाणी देऊ शकले असते पण त्यासाठी यश चोप्रासारखा डिरेक्टर असणे आवश्यक होते आणि खय्यामच्या नशिबी तेच न्हवते खय्यामच्या ५० टक्के हिट फिल्म्स यश चोप्रा कॅम्पशी निगडित आहेत ते त्यामुळेच ! अभिजातला सामावून घेण्यासाठी अभिजात दिग्दर्शक लागतात आणि इंडस्ट्रीत स्टारडम फॅशनमुळे त्याचाच अभाव आहे खय्यामना ह्याचा फटका बसला

खय्याम नौशाद स्कूलचे असले तरी त्यांनी पूर्णपणे आपला स्वतंत्र ठसा उमटवला त्यांचा जसा वापर करून घ्यायला हवा होता तसा झाला नाही भारतातील सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे इथे पॉप संगीत हे कायमच चित्रपटसंगीताशी जोडले जाते मग गायनाशी परिणामी जोवर एखादा संगीतकार चित्रपटात यशस्वी होत नाही तोवर त्याला मान्यता मिळणे कठीण जाते एकंदरच सगळ्या गोष्टीची खिचडी करण्याचा आपला स्वभाव संगीतालाही लागू होतो

खय्याम गेले आणि आता अभिजात मेलडीचे काय असा प्रश्नच निर्माण झालाय ओ पी नय्यर हृदयनाथ मंगेशकर जयदेव आणि खय्याम ह्यांनी मेलडीला जे माधुर्य दिले ते अवर्णनीय आहे ते कायमच आपल्यासोबत राहील प्रश्न हाच आहे कि २१ व्या शतकात ह्या मेलडीयस माधुर्याचं काय होणार आहे ?

श्रीधर तिळवे नाईक