Tuesday, August 8, 2023

साधी भव्यता गेली श्रीधर तिळवे नाईक 

 सिद्दीकी गेला , मराठीचा दक्षिणेशी हल्ली काही संबंध उरलेला नाही त्यामुळं तो कोण हाच प्रश्न अनेकांना पडला असेल दाक्षिणात्य व्यावसायिक चित्रपटांना हॉलिवूडच्या कमर्शियल लेव्हलला पोचवण्यात ज्या काही लेखक दिग्दर्शकांचा सिंहाचा वाटा आहे त्यापैकी तो एक ! कन्नडमधून मणिरत्नम तेलगूमधून राजामौली तामीळमधून के बालचंद्र आर मुरुगदास बालू महेंद्रू एस शंकर असे अनेक लोक दाक्षिणात्य सिनेमा उभा करत होते तेव्हा सिद्दीकीने मल्याळममधून कमर्शियल सिनेमा उभा करायला सुरवात केली 

त्याचा मी पाहिलेला पहिला सिनेमा रामजी राव स्पिकिंग होता तो द मॅन रनचा व्हर्जन होता व त्याचाही डिरेक्टर म्हणून पहिला चित्रपट होता प्रियदर्शनने तो हिंदीत हेरा फेरी म्हणून पुन्हा बनवला त्यानंतर त्याचा गाजलेला चित्रपट गॉडफादर होता हा रोमियो ज्युलिएटपासून इंस्पायर्ड होता पण त्याला खास सिद्दीकीचा टच होता तोही हिंदीत हलचल म्हणून आला नंतरचा काबुलीवाला रेकॉर्डब्रेक होता ह्यानंतरचा त्याचा आलेला हिटलर हा मल्याळममधला सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट होता ह्यात त्याने मामुटीकडून त्याने उत्तम कमर्शियल अभिनय करवून घेतला होता 

मराठी लोकांना त्याचा माहित असलेला सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे बॉडीगार्ड टर्मिनेटरपासून जो बॉडीगार्डचा नवा आदिबंध उभा राहिला आणि केविन कॉस्टनरच्या बॉडीगार्डपासून ज्याला मान्यता मिळाली तो आदिबंध सिद्दीकीने दाक्षिणात्य इंडियन पद्धतीने उभा करून दाखवला नयनथाराच्या साध्या लुकचा व अभिनयशैलीचा उत्तम वापर त्याने केला हिंदीत करीना कपूरनं स्टायलिश अभिनय करून ह्या व्यक्तिरेखेच्या साधेपणाचं नाटकी भज केलं 

सिद्दीकीची दिग्दर्शन शैली शंकर जयकिशनच्या संगीतासारखी होती सहज पचेल अशी साधी तरीही भव्य पण पौष्टिक ! फ्रेममध्ये दिग्दर्शनाचा कसलाही आव न आणणारी ! प्रत्यक्षात तशी कंपोझिशन्स तुम्ही करायला गेलात कि तुम्हाला हे किती कठीण आहे हे कळतं मुळात सिद्दीकी नट पण असेच घ्यायचा जे व्यक्तिरेखेत शोभतील उदा इंनोसन्टचं त्यानं केलेलं कास्टिंग खुद्द प्रोड्युसरलाही ह्या कास्टिंगमुळं हा चित्रपट चालेलं असं वाटलं न्हवतं  तो कथेच्या प्लॉटमध्ये सर्वत्र खेळकरपणा खेळवत ठेवायचा मात्र हा खेळकरपणा कॉमेडी करत असला तरी ती कधीच ओढूनताणून आणलेली वाटायची नाही एका अर्थाने के बालचंदरचं स्कूल त्यानं पुढं चालवलं 

त्याला माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक