Tuesday, March 7, 2017

धंदेवाईक , प्रायोगिक , समांतर आणि प्रायोगिक श्रीधर तिळवे नाईक 

कुठलीही कला (चित्रपट) संस्कृती यशस्वी होण्यासाठी तिच्यात
१ धंदेवाईक
२ व्यावसायिक
३ समांतर आणि
४ प्रायोगिक कलाकृती येत राहणे गरजेचं असतं ह्यातील प्रायोगिकला लोकप्रियता मिळाली नाही तरी किमान स्वागतता मिळणे फार गरजेचे  ते झालं नाही कि प्रायोगिकता खुंटायला लागते

जे व्यावसायिक प्रोफेशनल आहे त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते जेणेकरून अशा कलाकृतीत घातलेला पैसा वसूल होऊन त्यातून थोडाफार फायदा मिळेल

जे धंदेवाईक कमर्शियल आहे त्याला मात्र नुसती मान्यता मिळून चालत नाही तर प्रचंड लोकप्रियता मिळणे गरजेचे असते त्याशिवाय घातलेला पैसा जो कधी कधी प्रचंड असतो वसूल होत नाही साहजिकच मार्केट आणि ग्राहक ह्या दोन्ही गोष्टी इथे आवश्यक असतात

चित्रपट ह्याला अपवाद नसतात चित्रपटात पैश्याची गणितं फार मोठी होत जातात त्यामुळे प्रायोगिक चित्रपट हा जवळ जवळ अशक्य बनत जातो पैशे बरबाद करण्याची क्षमता असलेला निर्माता मिळाला तरच प्रायोगिक चित्रपट घडू शकतो न्यू वेव सिनेमानंतर चित्रपटात प्रायोगिक चित्रपटाची लाट कधी आल्याचे निदान मला तरी आठवत नाही . जे काही सध्या प्रायोगिक म्हणून येतंय ते प्रत्यक्षात बहुतांशी समांतर आहे समांतर कलाकृती हमखास स्वागतता कमावतात म्हणून नवीन लोक मोठ्या हुशारीने समांतर चित्रपट बनवतात कारण त्यांना समांतर चित्रपट हे मान्यतेकडे न्हेण्याची शिडी आहे हे नीट माहित असते ह्यातील अनेकांना प्रायोगिकतेशी काहीही देणेघेणे नसते व्यावसायिक होता येत नाही म्हणून प्रायोगिक अशीही काही जणांची स्ट्रॅटेजी असते आर्ट सिनेमाच्या नावाने हे खपूही शकते काही मात्र खूपच सिरीयस असतात जे प्रायोगिक झालेले आहे ते त्यांना फार महत्वाचे वाटत असते त्यांना त्या प्रायोगिकतेला पुढे न्ह्यायचे असते किंवा संपन्न करायचे असतात उदाहरणार्थ डॉल्स हाऊस ह्या प्रायोगिक नाटकाचे अनंत काणेकर लिखित घरकुल हे समांतर रूपांतर

अनेकदा समांतर रूप व्यावसायिक दृष्ट्या प्रस्तुत करता येईल असेही वाटू शकते मग व्यावसायिक पातळीवर आचार्य अत्रे डॉल हाऊसचे  व्यावसायिक रूपांतर करून ते घराबाहेर ह्या नावाने सादर करतात त्यासाठी काही आक्षेपार्ह बदल घडवतात आणि मूळ प्रायोगिकतेचा पाया विसविशीत करतात

चित्रपट कलेच्या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे कुठला देश स्वतःची म्हणून कुठली मुख्य शैली निवडतो ?फ्रान्सच्या बाबत ही शैली प्रामुख्याने प्रायोगिक व समांतर असल्याचे दिसते तर यूएसए विशेषतः हॉलिवूड व्यावसायिक शैली प्रधान शैली म्हणून निवडतो भारत विशेषतः बॉलिवूड मात्र धंदेवाईक शैली स्वतःची मुख्य शैली  म्हणून निवडतांना दिसतो साहजिकच बुद्धिवंतांच्यामध्ये बॉलिवूडबद्दल एक आंतरिक असमाधान आढळते
१९९९ नंतर मात्र हळहळू व्यावसायिक शैली हीही प्रधान शैली म्हणून विकसित होतांना दिसते विशेषतः बायोपिक्स आणि बायोसिन्स ह्यांच्या आधारे आलेल्या भाग मिल्खा भाग मेरीकॉम  वा तलवार सारख्या चित्रपटांनी ही व्यावसायिक शैली हिट होण्याची गॅरंटी निर्माण केली ज्याचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर होऊन मराठीतही लोकमान्य बालगंधर्वसारखे व्यावसायिक बायोपिक निर्माण झाल्याचे दिसते

फिक्शनमध्ये दिल चाहता हैं लगान मुन्नाभाई एम बी बी एस सारख्या चित्रपटांनी व्यावसायिक शैलीही यशस्वी होऊ शकते हे पुन्हा एकदा लक्षात आणून दिले वास्तविक व्ही शांताराम हे ह्या शैलीचे मुख्य पायोनियर त्यांचे माणूस , दो आँखे बारह हाथ , डॉ कोटणिसकी अमर कहाणी ( हा भारतातील पहिला व्यावसायिक बायोपिक चित्रपट ) ह्यांनी हा पायंडा पाडला होता पुढे प्यासा , आवारा , जोगन , नया दौर ह्या सारख्या चित्रपटांनी तो पुढे न्हेला होता पण नंतर उत्कृष्ट संगीत आणि रोमान्स ह्यांच्या धंदेवाईक मिश्रणाने ह्या पायाला उद्धवस्त केले सलीम जावेदनी सोशल ऍनगरही धंदेवाईक करून दाखवला आणि त्यामुळे सोशल कमिटमेण्टही बाजारू गोष्ट बनली हळूहळू ह्या कढीला शिळेपणा प्राप्त झाला आणि त्यातूनच पुन्हा एकदा व्यावसायिकतेची वाट निर्माण झाली प्रश्न असा आहे कि ह्यापुढे हॉलीवूडसारखी आपलीही प्रधान शैली हीच व्यावसायिक शैली होणार कि दबंग सारखे धंदेवाईक चित्रपट धंदेवाइकतेचा नवा पायंडा पाडणार ?

माझ्या मते १९५७ नंतर हळूहळू व्यावसायिक हटत गेला तसे होणार नाही ह्यापुढे बॉलिवूड धंदेवाईक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट निर्माण करत राहील दिल चाहता हैं आणि मेरीकॉम  सारखे चित्रपटही येत राहतील आणि दबंग सारखेही !

ह्यात प्रश्न असा निर्माण होतो कि ह्यात प्रायोगिक आणि समांतरचे काय ? तर ह्यांचे कठीण दिवस पुढेही चालू राहतील हेच त्याचे प्रामाणिक उत्तर आहे .

श्रीधर तिळवे नाईक