Saturday, November 26, 2022

अभिनयाचा बॅरिस्टर द्विधाता विक्रम गोखले श्रीधर तिळवे नाईक  

विक्रम गोखले गेले एक उत्तम अभिनेता मराठीतील उथळ कमर्शियलिझममुळे ग्रेट न होताच गेला प्रभावी मुखाभिनय हे केंद्र असलेला एक अभिनेता गेला 

ते हिंदीत आले तेव्हा त्यांची चेहरेपट्टी विश्वजितसारखी असल्याने त्यांच्या सौंदर्याचे फार कौतुक कुणाला न्हवते पण विश्वजितकडे नसलेली एक गोष्ट त्यांच्याकडे होती ती म्हणजे अभिनय ! त्यांची देहयष्टीचं अशी होती कि ते कायम पस्तिशीतले वाटत आणि ह्यामुळे त्यांचे कायम नुकसान झाले वास्तविक त्यांचा समकालीन असलेला मोहनलाल काहीसा असाच होता पण त्याच्यासाठी जसे रोल निर्माण झाले तसे विक्रम गोखले ह्यांच्यासाठी झाले नाहीत ह्याला मराठीचा करंटेपणा जबाबदार होता अपवाद कळत नकळत बॅरिस्टर इस्लामवाद व हिंदुत्ववाद ह्या दोन्ही विचारप्रणाली धर्मकेंद्री असल्याने त्या कधी कधी माणसाला अहंकारी बनवतात सावरकर आणि जिना ह्या दोघांचीही व्यक्तिमत्वे पाहावीत गोखलेंना असा अहंकार होता असा प्रवाद होता आणि त्याच्यामुळेही त्यांच्यासाठी असे काही रोल लिहिण्यात अडथळे झाले त्यांचे व्यक्तिमत्व अप्रोच करायला अवघड वाटे अशावेळी नाना पाटेकरने सार्वजनिक जीवनात येऊन खळखळून हसण्याचे हसवण्याचे प्रसंग आणले तसे त्यांनी केले नाही त्यामुळे कायमच एक सिरीयस प्रौढगंभीर अभिनेता अशी त्यांची इमेज होत गेली वास्तविक त्यांच्याकडे त्यांचा म्हणावा असा हलकेफुलकेपणा होता ते हसले कि मस्त वाटत 

त्यांचे अभिनयाचे स्कूल हे आत्मधर्मी रोमँटिक स्कूल असले तरी ते राजेश खन्नासारखे शिळे होत गेले नाहीत कारण त्यांचे मॅनरिझम तोचतोचपणात स्टायलाइझ्ड झाले नाही मात्र खन्नाची एक गोष्ट त्यांच्याकडे न्हवती ती म्हणजे गानाभिनय ते गाण्यात कधीच उर्जावान वाटले नाहीत त्यांचा बुद्धिमान वाटणारा चेहरा ह्याबाबत साथ देत नसावा मात्र इतर अनेक ठोकळ्यांपेक्षा ते चांगले होते म्हणजे उदा भिंगरीतलं सजणी ग किंवा बाळा गाऊ कशी अंगाईतलं सुपरहिट धुंदीत गाऊ मस्तीत राहू ह्या गाण्यांच्यात ते चांगले होते (धुंदीत गाऊ मध्ये तर ते हँडसम दिसतातच पण तत्कालीन अनेक अभिनेत्यांपेक्षा उत्तम रोमँटिक अभिनय करून गेलेत त्यांच्या ह्या लुकचा फायदा तत्कालीन निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी का उठवला नसेल असाच प्रश्न हे गाणे पाहताना पडतो )

त्यांच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद मुखाभिनय होता ते ह्याबाबत बाप होते आणि ह्याच्याच जीवावर त्यांनी भल्याभल्यांना टक्कर दिली उदा अग्निपथ मध्ये ते बच्चनच्या तोडीसतोड होते त्यांचा नेत्राभिनय भावदर्शी होता नैराश्य आणि उदासी ह्यांच्यातील फरक प्रकट करणारे जे मोजके अभिनेते होते त्यातील ते एक ! ते अभिनयात कधीही भावबंबाळ झाले नाहीत अगदी भावबंबाळ सीन्समध्येही ते योग्य संयम राखायचे 

एरव्ही संयमी असणारे विक्रम गोखले अचानक भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात असे बेभान का झाले ? कि त्यांचा हा सुप्त स्वभाव होता ?

 सेक्युलर श्रीराम लागू व हिंदुत्ववादी विक्रम गोखले ह्यांचा एक सुप्त संघर्ष सुरवातीपासूनच अस्तित्वात होता पण १९७५ ते २०१० ह्या काळात मीडिया सेक्युलॅरिझमच्या ताब्यात असल्याने सेक्युलर मीडियाने श्रीराम लागूंना अतोनात प्रसिद्धी दिली त्यांचे ईश्वराला रिटायर करा गाजले गाजवले गेले ह्या काळात सेक्युलर मीडियाने विक्रम गोखलेंच्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही बहुदा ह्याची खदखद गोखलेंच्या आत साठली असावी आणि मग त्यांनी कंगना राणावतच्या उथळ बोल्डनेसला अवसानघातकी प्रतिसाद दिला हा प्रतिसाद त्यांनी द्यायला नको होता त्यांच्या ह्या एका कृतीने त्यांची इमेज बिघडली 

दुर्देवाची गोष्ट अशी कि त्यांचा हिंदुत्ववादी स्टान्स नको तितका प्रमोट करून त्यांच्या अभिनयाची गुणवत्ता झाकोळवली गेली हे व्हायला नको होते पण सध्याचा काळ आयडियालॉजिकल डिक्टेटरशिपचा आहे आणि ह्याची सुरवात हिंदुत्ववाद्यांनी केली शत्रूशी लढता लढता आपण शत्रूसारखे बनतो ह्या नित्शेयीन न्यायाने सेक्युलॅरिस्ट पण आयडियालॉजिकल डिक्टेटरशिपकडे सरकायला लागलेत ह्यातून हातघाईचा उदय अटळ आहे ह्या हातघाईनेच गोखलेंच्या मृत्यूआधीच त्यांच्या मृत्यूची बातमी दिली गेली सोर्सेस रिलायबल आहेत कि नाही हे चेक करण्याची जबाबदारी कोणाची ? कधीकधी सोर्सेस धोखा देतात म्हणून क्षमा करून ही चर्चा थांबवणे आता आवश्यक वाटते 

गोखलेंच्या निधनामुळे जे काही झाले त्यातून एक प्रश्न मात्र निश्चित निर्माण झाला आहे कलावंताची कला व कलावंताची जीवनदृष्टी ह्यांचा संबंध कसा तपासावा ? कशाला किती महत्व द्यावं ? म्हणजे मला देशीवाद आवडत नाही पण नेमाडे लेखक म्हणून आवडतात किंवा मार्क्सवाद विवादास्पद वाटतो पण नारायण सुर्वे ,बर्टोल्ट ब्रेख्त , गॉर्की , मायकोवस्की माझे आवडते लेखक आहेत किंवा इस्लामवाद मला कधीच पटला नाही पण इकबाल मला आवडतो माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि अव्वल दर्जाचा कलावंत कला निर्माण करताना नेहमीच त्याच्या विचारप्रणालीला ओलांडून थेट आयुष्यात उतरतो आणि त्या आयुष्याला अभिव्यक्ती देतो साहजिकच ते वाचताना आपणाला भिडते ते त्याने व्यक्त केलेले आयुष्य ! त्याने व्यक्त केलेली माणसे ! अभिनयासंदर्भात व्यक्तिरेखा ! द्विधाता किंवा बॅरिस्टर सारख्या कलाकृतीत विक्रम गोखले अभिनयाचा अव्वल दर्जा ठेवून व्यक्तिरेखा उभारतात म्हणून आपण त्यांना चांगले अभिनेते मानतो . 

गोखले गेले एक उत्तम अभिनेता गेला , त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 

श्रीधर तिळवे नाईक 

No comments:

Post a Comment