Monday, August 17, 2020

निशिकांत कामत  श्रीधर तिळवे नाईक

निशी गेला आमच्या रुइया कट्ट्यावरचे एक ध्यासपर्व संपले अत्यंत मितभाषी , हुशार , दुःखाच्या गर्तेत बुडालेले डोळे घेऊन फिरणारा निशी मला प्रथम कट्ट्यावरच भेटला विषय अर्थातच भविष्य मला फ्लॅशेस  येतात हे रुईयाभर झाल्याने ह्या काळातल्या माझ्या अनेक ओळखी ह्या फ्लॅशेसनं व्हायच्या त्यातून पुढे एक गॅंग तयार होत गेली ह्यातले काही कॉलेजचे काही कट्ट्याचे मेम्बर्स निशी रुईया कॉलेजचाच ! मी चुकत नसेन तर कल्चरल सेक्रेटरीही झाला आमच्या ह्या गॅंगपूर्वी रुईयातल्या दोन गॅंग गाजल्या होत्या एक कवींची आणि दुसरी नाटकवाल्यांची विनय आपटे तिचा लीडर मात्र आमच्यापुढे त्यावेळी ह्या गँगचं नेतृत्व होतं ते महेश मांजरेकरकडं आमची तिसरी गॅंग होती जी स्वतंत्र असली तरी महेश मांजरेकरांच्या गॅंग विषयी अत्यंत आदर बाळगून होती आणि तिच्यात ज्ञानदा , प्रवीण दामले , मी असे कवीही होते आणि गजेंद्र अहिरे शेखर सरतांडेल सारखे नाटक फिल्मवालेही होते सर्वांच्याच सम्पर्कात असायची महेश मांजरेकर गँगचा अजय फणसेकर माझा बऱ्यापैकी जिवलग होता आणि तो निशिकांत कामतला घेऊन आला  आणि आमची ओळख झाली रुईयातल्या अनेकांच्याप्रमाणं त्याला सुपरस्टार व्हायचं होतं आणि अभिनयात करिअर होईल का हा त्याचा प्रश्न होता आणि दुसरा मी इथे सांगणार नाही मी उत्तर देऊ शकलो नाही कारण मला काही निशीबाबत फ्लॅश येईना मग त्याच्या दोन वाऱ्या झाल्या आम्ही ओळखायला लागलो आणि अचानक हा डीपीसमोर असतांना मला किक आली मी त्याला बोलावलं आणि म्हणालो डिरेक्शन्सचाही विचार कर !
म्हणजे अभिनेता म्हणून यश नाही
तस नाही पण अभिनेता म्हणून तुला जे भव्य यश हवं ते मला दिसत नाहीये

साहजिकच नंतर तो मला टाळायला लागला निगेटिव्ह प्रेडिक्शननंतर येणाऱ्या अशा रिऍक्शन्सची मला सवय झाली होती कारण कोल्हापुरात असतांना व्हायोलण्ट रिऍक्शन्सनाही  मला सामोरं जावं लागलं होतं ह्याबाबत माझा अटीट्युड जे दिसले ते  दिसले जे उखडायचं ते उखाडा असाच असायचा मग काही महिन्यांनी माझं दुसरं म्हणणं खरं झाल्याने तो आला आणि सोर्री म्हणाला मग आमचे संबंध चांगले झाले ते शेवटपर्यंत चांगलेच राहिले हळूहळू मी कवी वैगरेही आहे हे त्याला कळालं आणि नात्याला कलावंती किनार आली आम्ही दोघेही मराठी असलो तरी गोवन व कन्नड संस्कृतीचाही आमच्यावर थोडा परिणाम होता ज्याने कनेक्टिव्हिटी डेन्स केली

निशी टीचर्स फॅमिलीतून आला होता आणि आई संस्कृतची शिक्षिका असल्याने परंपरेशी त्याचे एक नाते होते

निशित एक आत्मधुंदता होती आणि ती ह्या व्यवहारी जगात कशी शाबूत ठेवायची हे त्याला सुरवातीला कळत न्हवते हळूहळू तो समतोल साधायला सरावला त्याचे कौटुंबिक आयुष्य त्यावेळी त्याला अकारण गुंतागुंतीचे वाटत होते हळूहळू त्याला मार्ग सापडायला लागला मीनव्हाईल तो थोडे एडिटिंगही शिकायला लागला आणि पुढे तो तीन वर्षे फक्त एडिटर म्हणून काम करणार  होता

कॅनरा आणि तुळू ह्या दोन संस्कृतीत (उत्तरेत मारवाडी बोहरा गुजराती असे आहेत )पैशाला असाधारण महत्व आहे तुम्ही पैसे कमावले नाहित कि तुम्हाला काही महत्त्व रहात नाही पण ह्याचा एक फायदाही असतो ह्या दोन्ही संस्कृतीतले लोक तुम्हाला मदत करायलाही तयार असतात ह्या संस्कृतीचा दबाव निशीवर ह्या काळात होता आपण पैसे कमावले पाहीजेत असं त्याला वाटायचे रुईया दादर माटुंगात असल्याने ह्या संस्कृतीचा परिणाम अटळ होता कॉस्मोपॉलिटन मराठी संस्कृती हे रुईयाचं वैशिष्ट्य जे आम्हा सगळ्यांच्यातच उतरलं त्याला निशी अपवाद न्हवता

निशी हळूहळू छोटीछोटी कामे करत फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवू लागला त्याचा मुख्य रस हा अभिनयातच होता मात्र त्याला कामे दिग्दर्शक म्हणून मिळायला लागली त्यामुळे अभिनयाबाबत मात्र आता गाडा सुपरस्टार झालो नाही तरी किमान उत्तम अभिनेता म्हणून नाव कमवेन असा झाला होता हवा आने दे हा डेब्यू असला तरी त्याला खरा ब्रेकथ्रू मिळाला तो सातच्या आत घरात मधून ! संजय सुरकरची माझ्या मते ही बेस्ट फिल्म ! ह्यातला अनिकेत हा ग्रे होता आणि निशिकांतने स्टाईल देत तो उत्तम पेलला मराठीला अलका कुबल व सचिंन टाईप टाइपमधून ज्यांनी बाहेर काढलं त्यातील ही एक फिल्म होती आणि त्यात निशीचाही वाटा होता ह्यादरम्यान आपणाला लग्न हवं आहे कि नाही ह्या त्याच्या डोक्यातल्या क्रायसिसला एक सुस्पष्ट आकार मिळायला लागला

माणसाला एकटेपणाचं ओझं तो अध्यात्मिक नसेल तर सहसा पेलत नाही निशिकांत आयुष्यभर एकट्याचे आयुष्य जगायचा प्रयत्न करत होता आणि त्याला ते झेपत न्हवते ह्यावर उपाय एकच होता सततचे काम !

आणि मग तो फिल्म इंडस्ट्रीतील जादुई क्षण आला निशीला डोंबिवली फास्ट मिळाला फॉलिंग डाऊन वर आधारित ह्या फिल्मने त्याला सर्वकाही दिले ह्या फिल्मला मराठीचे नॅशनल अवॉर्डही मिळाले फिल्म हिट झाली आणि तमिळमध्ये त्याचा रिमेक बनला मग हिंदीतला ब्रेक मुंबई मेरी जान आला दुर्देवाने ही फिल्म चालली नाही मग निशीचा रिस्क घ्यायचा उत्साह संपला व त्याने अत्यंत सेफ गेम खेळला फोर्स  फिल्म ऑलरेडी हिट होती
तिचा रिमेक बनवला मग दृश्यमचा रिमेक !दृश्यम हिट झाल्यावर निशीने पुन्हा एक मोठी रिस्क घेतली अक्टिंगवर रॉकी हँडसम त्याने दिग्दर्शन केले आणि अभिनयही ह्यातला व्हिलन जबरदस्त होता पण फिल्म चालली नाही निशिकांतने तो उत्तम अभिनेता असल्याचे पुन्हा सिद्ध केलं ह्यानंतर मात्र त्याच्या तब्येतीच्या तक्रारी डोकं वर काढायला लागल्या दिगदर्शनाची जबाबदारी घ्यावी कि न घ्यावी हा प्रश्न निर्माण झाला कारण दिग्दर्शन हे नेहमीच इर्रेग्युलर शेड्युलमुळे लाईफस्टाईल डिसीज घेऊन येतं निशीने अभिनयावर लक्ष्य केंद्रित केले

निशी हा खरेतर मूळचा अभिनेताच किंबहुना रुईयावर सगळे मूळचे अभिनेतेच पण जवळजवळ प्रत्येकाने नाव कमावले ते दिग्दर्शक म्हणून निशीने रुईया गँग्जची ही परंपरा टिकवली महेश मांजरेकरनंतर तोच एक असा होता ज्याचे हिंदीतही नाव होते

आजही निशी म्हंटलं कि मला आठवते ती त्याची शांतता आणि पॉजेस सक्सेसच्या आड अनेकांना ती दिसायची नाही बरं स्क्रॅच करून आतला निशी काढणं हेही जवळ जवळ अशक्य एखाद्या माणसाने समुद्र लपवावा आणि पाणपोई दाखवावी तसा तो होता

तो गेल्याने अख्खा रुईया कट्टा हळहळला असणार ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही काही दिवस तरी प्रत्येकाच्या काळजात पाली चुकचुकतील

निशाला माझा अखेरचा गुड बाय तो पॅकेजडील मधल्या पॅकेजला व्हिसा म्हणायचा मला खात्री आहे त्याच्या खिश्यात व्हिसा सापडणार नाही

श्रीधर तिळवे नाईक 


















Friday, July 3, 2020

सरोजखान अदाकारीची राणी श्रीधर तिळवे नाईक

सरोज खान गेल्या धकधक अरेस्ट झाल्याने गेल्या त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही कदाचित कारण क्रिएटिव्ह माणसं पैशाला पाच मिळतात अशी बॉलिवूडची गैरसमजूत आहे

त्यांची माझी भेट राजकुमार संतोषींच्या साल्याने किंवा चुलत साल्याने करून दिली होती मला  जोशी कि कांबळेसाठी झी अवॉर्ड मिळालं होतं आणि त्यामुळे ही ऑफर आली होती कुठल्याही नवीन डिरेक्टरला बॉलिवूडमधली अनुभवी माणसं चाचपून बघत बसतात माझीही चाचपणी होणार ह्याची मला कल्पना होती बाईंनी मी त्यांचं कुठलं कुठलं काम बघितलंय म्हणून विचारलं मी म्हणालो मी लिरिकल कोरिओग्राफीचा कट्टर पुरस्कर्ता आहे म्हणून तुमच्याकडं आलोय त्या एका वाक्यानं बाई बदलल्या कारण बाई स्वतः लिरिकलच्या कट्टर समर्थक होत्या साहजिकच मग गाडी त्याच अंगाने गेली त्यांचा व्यासंग प्रचंड होता अनेक गाणी त्यांनी बघितली होती शेवटी त्या म्हणाला ."मला वेळ कमी आहे पण दोन गाणी मी करते "

बाई संपूर्ण चित्रपट करतात हे ऐकून होतो साला म्हणाला ह्याचा अर्थ उरलेली गाणी त्यांचा असिस्टंट करणार मला प्रॉब्लेम न्हवता चित्रपट झाला नाही पण बाई मनात ठसल्या त्या ठसल्याच

नृत्यावरची त्यांची निष्ठा केवळ वादातीत होती त्यांचे स्कूल काहीसे पारंपरिक होते पण त्यात नवे युग भरण्याची त्यांची ताकद होती त्यांची दोन गाणी ही माझ्या मते पॉप कोरिओग्राफीमधली माईलस्टोन आहेत पहिले क्लब स्टेज डान्सची परिभाषा बदलून टाकणारे तेजाब मधले एक दो तीन आणि दुसरे सेन्शुअस गाण्यातील बेटामधले  धक धक करने लगा परंपरेत राहूनही किती उत्कृष्ट काम करता येते त्याची ही दोन्ही गाणी उदाहरणे आहेत एक दो तीन ने मॉब हँडलिंग आणि रॅम्प वॊकिंग स्टेजच्या वापराचे नवे आयाम सादर केले हे त्यांनीच शोधलेले आयाम हमको आजकल है इंतजार मध्ये त्यांनी मोशन स्लो करत फार परिणामकारकतेने वापरले

धकधकला त्यांनी एक साधा गोठा किती लेव्हलला जाऊन सेन्शुअस करता येतो ह्याचे एक उदाहरणच प्रस्तुत केले हे ड्युएट होते तरीही ते कुठेही अश्लील न करता मादकतेची सगळी उंची ह्यात गाठली गेली ह्या गाण्यातली नायिका म्हणजे स्फोटक मादक दारूचे कोठार आहे शृंगार आणि लैंगिक भ्रम अश्लीलतेला टच करतात पण परततात ते अश्लीलतेत घुसत नाहीत मुखमुद्रा  आणि हस्तमुद्रा ह्या बाईंच्यापुढे हात जोडून उभ्या असत आणि कानात सांगत ही अशी अदाकारी करूया तामझामपेक्षा अदाकारी महत्वाची हे बाईंचे तत्वच होते

त्यांचे स्वतःचे आयुष्य म्हणजे एक निरंतर संघर्ष होता त्या ह्या संघर्षाच्या अनुभवातून बोलत स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या स्वभावातच होता केवळ कॉपी करणारे कोरिओग्राफर त्यांना चीड आणत चौथ्या नवतेत नृत्य आणि नृत ह्यांना समान महत्व आहे त्यांनी हा बदल स्वीकारला नाही त्या कायमच नृत्याची भाषा बोलत राहिल्या

आणि आता त्या गेल्या त्यांना माझी आदरांजली


श्रीधर तिळवे नाईक



इरफान 

Sunday, December 15, 2019

दर वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीत एक तासाची ३८ व्याख्याने दिली मला वेळ मिळाला तर आणखी बहुदा ६२ व्याख्याने देईन कधीकाळी पीएचडीसाठी केलेले लिखाण सादर करणे असे त्याचे स्वरूप असले तरी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्यामुळे  ही व्याख्याने इंटरेस्टिंग बनतात माझ्या व्याख्यानांना इंटरनेट व त्यामुळे गूगल वापरण्याची नेहमीच अनुमती असते त्यामुळे विध्यार्थी काहीही विचारत असतात त्यांना इंटरेस्टिंग वाटेल ते दाखवत असतात कधीकधी गूगललाही दुरुस्त करायची वेळ येते विषय नाटक संहिता इझम्स असे असले  तरी माझ्या वर्गात रिअल नंबर व रॅशनल नंबर ह्यांच्यात फरक काय असा प्रश्न  रिऍलिझम संदर्भात एखादा मॅथ्सचा विद्यार्थी विचारतो  तर एखादा रॅशनॅलिझमच्या संदर्भात मुसलमानांचे ऑप्टिक्समधले योगदान सांगितले कि न्यूटनच्या आणि अल हायझ च्या ऑप्टिक्स मधला फरक विचारतो सगळ्या शाखा प्रशांखाची घुसळण माझ्या वर्गात होत असते एखादीचे आई आणि वडील दोघेही पोलीस असतात आणि तरीही हैद्राबादच्या रेप केसनंतर ती जेव्हा माझी आई पोलीस असूनही कधी कधी घाबरते असं सांगते तेव्हा काय प्रकारची असुरक्षितता आपण पसरवून ठेवलीये ते स्पष्ट कळते

ह्यावर्षी विद्यार्थ्यांनी आणि मंगेशने आग्रह धरल्यामुळे आणि ह्या आग्रहाला योगेश सोमण ह्यांनी मान दिल्याने मला बोलावले गेले अन्यथा ---- विद्यार्थ्यांचे मिळणारे प्रेम आणि वैयक्तिक प्रश्नांची चर्चा करताना सर आपल्या भल्याचाच विचार करतील हा त्यांनी दाखवलेला विश्वास मला नेहमीच महत्वाचा वाटत आलाय

नवीन पिढीला त्यांच्या पद्धतीने शिकवले कि हमखास प्रतिसाद मिळतो असा माझा अनुभव आहे छापीलतेत अडकलेल्या लोकांना हे पटवायचे कसे हा खरा प्रश्न आहे

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, August 20, 2019

खय्यामना आमच्या पिढीने ऐकले ते कभी कभी त्रिशूल पासून ते एव्हढे क्लासी संगीतकार आहेत ह्याची आम्हाला कल्पनाच न्हवती त्यांचं तोंडात बसलेलं पहिलं गाणं गापूची गापूची गम गम हे त्रिशूल मधलं लहानपणासाठी असली गाणी परफेक्ट !  पुढे संगीताची अधिक अक्कल आली आणि डान्ससाठी सोकावलेलं माझं शरीर डान्सिकल गाण्याव्यतिरिक्त मेलडीही ऐकायला लागले पुढे लक्ष्यात आले कि खय्यामसाहेबांची क्लासिकल इमेज इतकी त्यांच्या फॅन्सनी मोठी केलीये कि गापूची व तेरे चेहरेसे व मौसम मौसम लव्हली मौसम(थोडीसी बेवफाई ) सारखी गाणी चक्क कानाआड केली जातायत

लता मंगेशकरांनी त्यांचे सर्वात बेस्ट गाणे म्हणून रझिया सुलतान मधले ए दिले नादान निवडले तेव्हा थोडा धक्का बसला होता पण नंतर कळले कि बाई अधूनमधून घोषणा करत असतात मात्र हे एक अफलातून गाणे होते एव्हढे निश्चित

बाजार आणि उमराव जान कळस होते एका अर्थाने आमच्या पिढीने त्यांचा बेस्ट फॉर्म बघितला

त्याआधीची त्यांची "हे कली कली के लंबपर " " बहारो मेरा जीवनभी संवारो "  " श्यामे गमकी कसम "  "तू ही सागर तूही किनारा( हे सुलक्षणा पंडितने पंडितने गायलेले गाणे तिला फिल्मफेयर देऊन गेले होते )" ही माधुर्याने भरलेली गाणी कानांना खिळवून ठेवणारी होती

गीतांच्या बोलाबाबत ते गीतात काव्य असण्याबद्दल सजग होते आणि त्यामुळेच बावरी चा अपवाद वगळता आनंद बक्षीच्या वाट्याला ते फारसे गेले नाहीत गुणवत्तेचा आग्रह हा तुम्ही जर यशस्वीही झालात तर ऐकून घेतला जातो जसा कि तो नौशादबाबत ऐकून घेतला गेला खय्यामच्या नशिबाने ह्याबाबत १९८५ नंतर पुन्हा पलटी मारायला सुरवात केली आणि एकापाठोपाठ एक फिल्म्स फ्लॉप व्हायला लागल्या हिट है तो फिट है ह्या चालीने चालणाऱ्या बॉलिवूडमध्ये हे परवडणारे न्हवते त्यातच नंतर बप्पी लाहिरीच्या हिम्मतवालाने संगीताचा बाज पूर्णच बदलला आम्ही लोक आता तरुण झालो होतो आणि आम्हाला फक्त नाचायचं होतं ऐकायचं न्हवतंच बाप्पीची गाणी नाचायला लय भारी असल्याने आम्ही ता थय्या ता थय्या करत बसलो आम्ही खय्याम फेकूनच दिला खरंतर आणि त्यातच त्यांच्या फिल्म्स वाईट होत्या आता संगीतासाठी फिल्म्स बघण्याचा जमाना संपला होता कारण कॅसेट्स आल्या होत्या खय्यामसाठी वाईट फिल्मा बघण्यापेक्षा त्यांचं संगीत कॅसेटवर ऐकणे आमच्या फाटक्या खिशाला परवडेबल होतं नदीम श्रवणमुळे मेलडी परत आली तरी ही मेलडी अभिजात न्हवती तिच्यात एक कामचलाऊपणा होता खय्याम अभिजात होते त्यामुळे फिट्ट होईनात बरं १९८७ नंतरची गाणी आधीच्या दर्जाला मॅच होणारी न्हवती शिवाय नदीम श्रवण संगीतात एक तरी गाणे डान्ससाठी बनवायचे म्हणजे साजण मध्ये देखा हैं पहली बार साजणकी आँखोंमे प्यार हे डान्सिकल होतेच खय्याम असे गाणे देऊ शकत नाहीत अशी त्यांची व इतरांची पण समजूत होती वास्तविक ते डान्सिकल गाणी देऊ शकले असते पण त्यासाठी यश चोप्रासारखा डिरेक्टर असणे आवश्यक होते आणि खय्यामच्या नशिबी तेच न्हवते खय्यामच्या ५० टक्के हिट फिल्म्स यश चोप्रा कॅम्पशी निगडित आहेत ते त्यामुळेच ! अभिजातला सामावून घेण्यासाठी अभिजात दिग्दर्शक लागतात आणि इंडस्ट्रीत स्टारडम फॅशनमुळे त्याचाच अभाव आहे खय्यामना ह्याचा फटका बसला

खय्याम नौशाद स्कूलचे असले तरी त्यांनी पूर्णपणे आपला स्वतंत्र ठसा उमटवला त्यांचा जसा वापर करून घ्यायला हवा होता तसा झाला नाही भारतातील सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे इथे पॉप संगीत हे कायमच चित्रपटसंगीताशी जोडले जाते मग गायनाशी परिणामी जोवर एखादा संगीतकार चित्रपटात यशस्वी होत नाही तोवर त्याला मान्यता मिळणे कठीण जाते एकंदरच सगळ्या गोष्टीची खिचडी करण्याचा आपला स्वभाव संगीतालाही लागू होतो

खय्याम गेले आणि आता अभिजात मेलडीचे काय असा प्रश्नच निर्माण झालाय ओ पी नय्यर हृदयनाथ मंगेशकर जयदेव आणि खय्याम ह्यांनी मेलडीला जे माधुर्य दिले ते अवर्णनीय आहे ते कायमच आपल्यासोबत राहील प्रश्न हाच आहे कि २१ व्या शतकात ह्या मेलडीयस माधुर्याचं काय होणार आहे ?

श्रीधर तिळवे नाईक


Friday, July 5, 2019

Tuesday, March 7, 2017

धंदेवाईक , प्रायोगिक , समांतर आणि प्रायोगिक श्रीधर तिळवे नाईक 

कुठलीही कला (चित्रपट) संस्कृती यशस्वी होण्यासाठी तिच्यात
१ धंदेवाईक
२ व्यावसायिक
३ समांतर आणि
४ प्रायोगिक कलाकृती येत राहणे गरजेचं असतं ह्यातील प्रायोगिकला लोकप्रियता मिळाली नाही तरी किमान स्वागतता मिळणे फार गरजेचे  ते झालं नाही कि प्रायोगिकता खुंटायला लागते

जे व्यावसायिक प्रोफेशनल आहे त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते जेणेकरून अशा कलाकृतीत घातलेला पैसा वसूल होऊन त्यातून थोडाफार फायदा मिळेल

जे धंदेवाईक कमर्शियल आहे त्याला मात्र नुसती मान्यता मिळून चालत नाही तर प्रचंड लोकप्रियता मिळणे गरजेचे असते त्याशिवाय घातलेला पैसा जो कधी कधी प्रचंड असतो वसूल होत नाही साहजिकच मार्केट आणि ग्राहक ह्या दोन्ही गोष्टी इथे आवश्यक असतात

चित्रपट ह्याला अपवाद नसतात चित्रपटात पैश्याची गणितं फार मोठी होत जातात त्यामुळे प्रायोगिक चित्रपट हा जवळ जवळ अशक्य बनत जातो पैशे बरबाद करण्याची क्षमता असलेला निर्माता मिळाला तरच प्रायोगिक चित्रपट घडू शकतो न्यू वेव सिनेमानंतर चित्रपटात प्रायोगिक चित्रपटाची लाट कधी आल्याचे निदान मला तरी आठवत नाही . जे काही सध्या प्रायोगिक म्हणून येतंय ते प्रत्यक्षात बहुतांशी समांतर आहे समांतर कलाकृती हमखास स्वागतता कमावतात म्हणून नवीन लोक मोठ्या हुशारीने समांतर चित्रपट बनवतात कारण त्यांना समांतर चित्रपट हे मान्यतेकडे न्हेण्याची शिडी आहे हे नीट माहित असते ह्यातील अनेकांना प्रायोगिकतेशी काहीही देणेघेणे नसते व्यावसायिक होता येत नाही म्हणून प्रायोगिक अशीही काही जणांची स्ट्रॅटेजी असते आर्ट सिनेमाच्या नावाने हे खपूही शकते काही मात्र खूपच सिरीयस असतात जे प्रायोगिक झालेले आहे ते त्यांना फार महत्वाचे वाटत असते त्यांना त्या प्रायोगिकतेला पुढे न्ह्यायचे असते किंवा संपन्न करायचे असतात उदाहरणार्थ डॉल्स हाऊस ह्या प्रायोगिक नाटकाचे अनंत काणेकर लिखित घरकुल हे समांतर रूपांतर

अनेकदा समांतर रूप व्यावसायिक दृष्ट्या प्रस्तुत करता येईल असेही वाटू शकते मग व्यावसायिक पातळीवर आचार्य अत्रे डॉल हाऊसचे  व्यावसायिक रूपांतर करून ते घराबाहेर ह्या नावाने सादर करतात त्यासाठी काही आक्षेपार्ह बदल घडवतात आणि मूळ प्रायोगिकतेचा पाया विसविशीत करतात

चित्रपट कलेच्या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे कुठला देश स्वतःची म्हणून कुठली मुख्य शैली निवडतो ?फ्रान्सच्या बाबत ही शैली प्रामुख्याने प्रायोगिक व समांतर असल्याचे दिसते तर यूएसए विशेषतः हॉलिवूड व्यावसायिक शैली प्रधान शैली म्हणून निवडतो भारत विशेषतः बॉलिवूड मात्र धंदेवाईक शैली स्वतःची मुख्य शैली  म्हणून निवडतांना दिसतो साहजिकच बुद्धिवंतांच्यामध्ये बॉलिवूडबद्दल एक आंतरिक असमाधान आढळते
१९९९ नंतर मात्र हळहळू व्यावसायिक शैली हीही प्रधान शैली म्हणून विकसित होतांना दिसते विशेषतः बायोपिक्स आणि बायोसिन्स ह्यांच्या आधारे आलेल्या भाग मिल्खा भाग मेरीकॉम  वा तलवार सारख्या चित्रपटांनी ही व्यावसायिक शैली हिट होण्याची गॅरंटी निर्माण केली ज्याचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर होऊन मराठीतही लोकमान्य बालगंधर्वसारखे व्यावसायिक बायोपिक निर्माण झाल्याचे दिसते

फिक्शनमध्ये दिल चाहता हैं लगान मुन्नाभाई एम बी बी एस सारख्या चित्रपटांनी व्यावसायिक शैलीही यशस्वी होऊ शकते हे पुन्हा एकदा लक्षात आणून दिले वास्तविक व्ही शांताराम हे ह्या शैलीचे मुख्य पायोनियर त्यांचे माणूस , दो आँखे बारह हाथ , डॉ कोटणिसकी अमर कहाणी ( हा भारतातील पहिला व्यावसायिक बायोपिक चित्रपट ) ह्यांनी हा पायंडा पाडला होता पुढे प्यासा , आवारा , जोगन , नया दौर ह्या सारख्या चित्रपटांनी तो पुढे न्हेला होता पण नंतर उत्कृष्ट संगीत आणि रोमान्स ह्यांच्या धंदेवाईक मिश्रणाने ह्या पायाला उद्धवस्त केले सलीम जावेदनी सोशल ऍनगरही धंदेवाईक करून दाखवला आणि त्यामुळे सोशल कमिटमेण्टही बाजारू गोष्ट बनली हळूहळू ह्या कढीला शिळेपणा प्राप्त झाला आणि त्यातूनच पुन्हा एकदा व्यावसायिकतेची वाट निर्माण झाली प्रश्न असा आहे कि ह्यापुढे हॉलीवूडसारखी आपलीही प्रधान शैली हीच व्यावसायिक शैली होणार कि दबंग सारखे धंदेवाईक चित्रपट धंदेवाइकतेचा नवा पायंडा पाडणार ?

माझ्या मते १९५७ नंतर हळूहळू व्यावसायिक हटत गेला तसे होणार नाही ह्यापुढे बॉलिवूड धंदेवाईक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट निर्माण करत राहील दिल चाहता हैं आणि मेरीकॉम  सारखे चित्रपटही येत राहतील आणि दबंग सारखेही !

ह्यात प्रश्न असा निर्माण होतो कि ह्यात प्रायोगिक आणि समांतरचे काय ? तर ह्यांचे कठीण दिवस पुढेही चालू राहतील हेच त्याचे प्रामाणिक उत्तर आहे .

श्रीधर तिळवे नाईक